आरसा  (नातं आमचं दोघांचं)

कधी तरी एके  काळी, लळा लागला होता एका जिवलग मित्राचा

वाटायचे,  माझ्या शिवाय करमत नसावे, पुन्हा पुन्हा जवळ बोलवायचा

माझे लालसर ओठ अलगद उघडून फोटो घ्यांचा, शुभ्र माळेचा 

काळे चमकदार डोळे पाहताच राही रंग गुलाबी गालांचा

कधी तरी एके  काळी, लळा लागला होता एका जिवलग मित्राचा

करुनी दिली त्यानेच जाण यौवनाची; दारी मंडप सजला सगे -सोयऱ्यानी

लग्न सोहळ्याचा….आणि घेतला घालून फास मी संसाराचा

अनेक दिवस अनेक रात्री उलटून गेल्या, तश्या भेटी कमी होत गेल्या मित्राच्या

वाटायचं सांगाव्या गोष्टी मित्राला सुखदुःखाच्या,

पण विसरून जाई, भेटी होत उमावस्या पुनवेच्या

कधी तरी एके  काळी, लळा लागला होता एका जिवलग मित्राचा

 काळ्या भोर केसानी रंग घेतला उन्हातल्या डोंगरी करड्या गवताचा

गोऱ्या मुखवट्याने वर्ण स्वीकारला सुरकुतल्या पिकल्या पानाचा

किलबिल्ले डोळे शोधू लागले, तुझ्या डोळ्यात डोळे घालून आनंद  लुटायचा

संपून गेल्या डोळ्या पुढच्या लहरी उजेडाच्या , आता राहिल्या लहरी फक्त काळोखाच्या

कधी तरी एके  काळी, लळा लागला होता एका जिवलग मित्राचा

जिवलग मित्र आमच्या दोघात दुरावा निर्माण झाला पुढच्या आयुष्याचा

आता मनस्वप्नातल्या प्रतिबिंबाशी करीन मी गुजगोष्टी मधुर स्मरणाच्या.

*******************

तुमचे मनःपूर्वक आभार 

 

Image: luis-villasmil-unsplash